आत्मनिर्भर भारताचा भक्कम पाया; डिजिटल इंडियाला ११ वर्ष पूर्ण

Foto
नवी दिल्ली : ११ वर्षांतील डिजिटल इंडियाच्या यशाने जगभरात भारताला एक नवी ओळख दिली आहे. हे देशवासीयांचा, नवनिर्मिती आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करून देशाला नव्या उंचीवर नेण्याचा दृढनिश्चय दर्शवते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ङ्गडिजिटल इंडियाफ उपक्रमाला ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत विचार मांडले.

एका पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी संस्कृत सुभाषित शेअर केले. पंतप्रधान मोदी लिहितात की, विज्ञानसारतिर्यस्तु मनःप्रग्रहवनन्नरः| सोऽध्वनः परमाप्नोति तद्विष्णोः परमं पदम्|, याचा अर्थ असा की, ज्या व्यक्तीची विवेकबुद्धी वैज्ञानिक सारथ्याप्रमाणे दक्ष असते आणि मन संयमी असते, ती व्यक्ती जीवनाच्या मार्गातील गुंतागुंतीवर मात करून अंतिम ध्येय गाठते, असे पंतप्रधान मोदी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

आत्मनिर्भर भारताचा एक भक्कम पाया
डिजिटल इंडियाफ हा विकसित आणि आत्मनिर्भर भारताचा एक भक्कम पाया आहे. गेल्या ११ वर्षांत, या उपक्रमाने गरीब आणि वंचित घटकांना सक्षम करण्याबरोबरच नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऑप्टिकल फायबर नेटवर्कच्या विस्तारापासून ते डिजिटल व्यवहारांपर्यंत, या उपक्रमाच्या अभूतपूर्व यशामुळे भारताकडे जागतिक लक्ष वेधले गेले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

या उपक्रमाने प्रशासनाची पुनर्व्याख्या केली 
डिजिटल इंडियाफ उपक्रमाच्या शुभारंभाला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. या उपक्रमाने प्रशासनाची पुनर्व्याख्या केली आहे, नागरिकांना सक्षम केले आहे. सर्वांगीण विकासाला गती दिली आहे. याचा जीवनाच्या प्रत्येक पैलूवर परिणाम झाला आहे. लाभार्थ्यांसाठी पारदर्शकतेसह सुलभ डिजिटल पेमेंट आणि थेट लाभ हस्तांतरणापासून ते डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या विस्तारापर्यंत, जीवनमान सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञान हे एक शक्तिशाली साधन बनले आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, डिजिटल इंडियाने भारताच्या प्रत्येक भागात, विशेषतः गावांमध्ये आणि टियर-२ व टियर-३ शहरांमध्ये नवनिर्मितीची लाट आणली आहे. देशाच्या कानाकोपर्‍यातील तरुण उद्योजक, स्टार्टअप्स आणि नवोन्मेषक आपल्या गंभीर आव्हानांवर उपाययोजना तयार करत आहेत.

या उपक्रमाने शिक्षण, आरोग्यसेवा, कृषी, व्यापार आणि सार्वजनिक सेवा वितरण मजबूत केले आहे, ज्यामुळे शासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि सुलभ झाले आहे. ते पुढे म्हणाले, डिजिटल क्षेत्रातील आमच्या प्रगतीमुळे भारत एआय , सेमीकंडक्टर, क्वांटम कंप्युटिंग आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये वेगाने प्रगती करत आहे.  यामुळे विकास आणि संधींचे नवीन मार्गही खुले होतील. आमचे लक्ष असे भविष्य घडवण्यावर राहील, जिथे तंत्रज्ञान मानवतेची सेवा करेल, प्रत्येक नागरिकाला सक्षम करेल आणि शाश्वत विकासाला चालना देईल, असेही ते म्हणाले.